टेबललँडवर सुरक्षेसाठी लावलेलं पत्रं धोकादायक; नगरपालिकेचे दुर्लक्ष, पर्यटकांच्या जीविताशी होणारा खेळ


पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) पाचगणी टेबललँडवर सुरक्षिततेसाठी लावलेले पत्रे पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहेत. नगरपालिकेच्या या दुर्लक्षामुळे पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात टेबललँडवर चिखल आणि घसरडे असते, त्यामुळे पर्यटक इथे येण्यास टाळतात. परंतु, नुकताच पाऊस थांबल्यामुळे अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. मात्र, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतेही योग्य नियोजन नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.टेबललँडवर सुरक्षिततेसाठी पत्रे लावण्यात आले आहेत, पण त्यामध्ये मोठाले अंतर ठेवले आहे. अनेक ठिकाणी ही पत्रे तुटलेली आणि वाकलेली असल्याने ती पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहेत. तसेच, नगरपालिकेच्या गाड्यांना जाण्यासाठी रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या गंभीर स्थितीबाबत अनेकांनी नगरपालिकेवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी नगरपालिकेची असून, त्यांनी याकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना न केल्यास या गंभीर दुर्घटनेला नगरपालिका जबाबदार असेल, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.नगरपालिका प्रशासन या समस्येवर त्वरित तोडगा काढणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करून या धोकादायक पत्रांना तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ला आता जोर धरू लागली आहे.

