पाचगणी शहरात ‘नारळ’ चिन्हाची जोरदार चर्चा!
नगराध्यक्षपदासाठी सख्ख्या भावांची लढत: दीपक कांबळे यांना 'नारळ बाग', तर संतोष कांबळे यांना 'नारळ'!

भिलार (प्रतिनिधी): सध्या पाचगणी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी हे दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले असून, त्यांना मिळालेल्या निवडणूक चिन्हांमुळे पाचगणीकरांमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर चिन्हांचे वाटप झाले असता, दोन भावांपैकी मोठा भाऊ दीपक कांबळे यांना ‘नारळाची बाग’ हे चिन्ह मिळाले आहे, तर धाकटा भाऊ संतोष कांबळे यांना ‘नारळ’ हे चिन्ह मिळाले आहे.
एकाच वस्तूशी संबंधित परंतु वेगळी चिन्हे दोन सख्ख्या भावांना मिळणे, हा पाचगणी शहरात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. पाचगणीकर या घटनेकडे केवळ एक योगायोगाने मिळाला आहेत याची चर्चा करताना दिसत आहेत.
दीपक कांबळे यांना ‘नारळाची बाग’
संतोष कांबळे यांना ‘नारळ’
हे दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने, त्यांची ही थेट लढत शहरासाठी नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे. विशेषतः, हे ‘नारळ’ आणि ‘नारळाची बाग’ ही चिन्हे मतदारांना कोणाकडे आकर्षित करतात आणि याचा अंतिम निकालावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दोन्ही कांबळे बंधूंच्या प्रचाराची रणधुमाळी आणि मतदारांचा कल कोणत्या बाजूने झुकतो, यावर पाचगणीच्या नगराध्यक्षपदाचा निकाल अवलंबून असेल.
