मेढा

“आबा, मला माफ करा!” वाडा-कुंभरोशी गणातील मकरंद पाटलांच्या कार्यकर्त्याचं पत्र व्हायरल

बामणोली अक्षय गोरे (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)महाबळेश्वर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या वाडा-कुंभरोशी गणातून एक असं पत्र समोर आलंय, ज्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवली आहे. गेली १३ वर्षे एकाच नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिलेल्या एका कार्यकर्त्याने थेट आपल्या ‘आबांना’ अर्थातच मंत्री मकरंद पाटील यांना पत्र लिहून यावेळची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंयं.

“आबा, आपण विधानसभेला भेटूच, पण यावेळी पंचायत समितीला ‘धनुष्यबाणा’लाच साथ देणार,” असा खळबळजनक मजकूर या पत्रात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाड्यातील २२ गावांचे स्वीकारलेले पालकत्व व केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्याने म्हटले आहे.

“शेवटी तो कार्यकर्ता म्हणतो, ‘आबा, माझं काही चुकलं असेल तर माफ करा, पण मला एकवेळ राज्याचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या भूमिपुत्राला साथ द्यायची आहे.’ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे पत्र सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्री मकरंद आबांच्या कार्यकर्त्याने लिहिलेलं पत्र जसेच्या तसे,
“प्रिय आबा, मला आज आपल्या सोबत बोलायचंयं. मी गेली १३ वर्षे आपला निष्ठावंत हाय. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मी फक्त आणि फक्त आपल्यासोबत प्रामाणिक राहिलो, पुढंही राहीन. पण ह्यावेळीच्या निवडणुकीला आमच्या वाडा कुंभरोशी गणात शिंदे सायबांच्या धनुष्यबाणाला मत द्यायचा निर्धार केलाय. कारणही तसंच हाय. आमच्या वाड्यातील बावीस गावांचं पालकत्व एकनाथ शिंदे सायबांनी स्वीकारलंयं. आपल्या या भूमिपुत्रांनं या परिसरात अनेक विकासकामं केल्यात. त्यामुळं आबा ह्यावेळी आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की, धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरीलच बटन दाबायचं. आबा आपण विधानसभेला भेटूच. आबा मी तुमचाच हाय. पण ह्यावेळेस मला माफ करा. मला एक वेळ राज्याचं नेतृत्व करणाऱ्या आपल्या भूमिपुत्राला माझं मत द्यायचयं. काय चुकलं असलं तर माफ करा. तुमचाच : वाड्यातील एक निष्ठावान कार्यकर्ता”

दरम्यान, वाडा-कुंभरोशी गणात शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू संजय हरिश्चंद्रराव मोरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिन श्रीरंग उत्तेकर यांच्यात ही हायव्होल्टेज लढत होत आहे. त्यामुळे या दुरंगी लढतीत कोण सिकंदर ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button