पांचगणी

पाचगणीत कोकेन ड्रग्सचा पर्दाफाश; मुंबईच्या १० पर्यटकांना आलिशान गाड्यांसह अटक ​सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध मोठी मोहीम; जावळीनंतर आता पाचगणी पोलिसांची धडक कारवाई

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क):
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीमध्ये अंमली पदार्थांच्या काळ्या कारभाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाचगणी पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत मुंबईहून आलेल्या १० संशयितांना कोकेनसह ताब्यात घेतले आहे. जावळी तालुक्यातील सावळी येथील ११५ कोटींच्या ड्रग्ज कारवाईनंतर अवघ्या दोन दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
​मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुंबईहून पाचगणी परिसरात कोकेनचा पुरवठा होणार होता. या माहितीच्या आधारे पाचगणी पोलीस आणि एलसीबीच्या पथकाने सापळा रचला. संशयास्पद वाटणाऱ्या स्कोडा आणि एमजी हेक्टर या दोन आलिशान वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये ड्रग्जचा साठा आढळून आला.
​अंमली पदार्थ: अंदाजे १३ ग्रॅम कोकेन (कोकण कॅप्सूलसह).
​वाहने: दोन आलिशान गाड्या (स्कोडा आणि एमजी हेक्टर).
​ताब्यात घेतलेले आरोपी: १० जण (सर्व मुंबईहून पर्यटक म्हणून आले होते).
पर्यटनाच्या नावाखाली काळा धंदा
​प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हे आरोपी पर्यटक म्हणून पाचगणीत दाखल झाले होते. पर्यटन स्थळांच्या गर्दीचा फायदा घेऊन अंमली पदार्थांची विक्री किंवा पुरवठा करण्याचा त्यांचा उद्देश असावा, असा संशय पोलिसांना आहे. या कारवाईमुळे पाचगणीसारख्या शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या हिल स्टेशनवर ड्रग्ज रॅकेटचे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
​या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ताब्यात घेतलेल्या १० जणांची कसून चौकशी सुरू असून ​या रॅकेटचे मूळ धागेदोरे कुठे आहेत?​पाचगणीतील स्थानिक लोकांचा यात सहभाग आहे का?​यापूर्वी अशा प्रकारे किती वेळा माल पुरवण्यात आला? या प्रश्नांचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
​जिल्ह्यात ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र: गेल्या काही दिवसांतील कारवाई पाहता सातारा पोलीस अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button