महाबळेश्वरच्या डोंगराळ भागात ‘शोपीस’ मोबाईल टॉवर –वीज नसल्याने संपर्क व्यवस्था कोलमडली!
सौर ऊर्जेवर चालणारे टॉवर पावसाळ्यात अपयशी; नागरिक संपर्कविहीन, मूलभूत सेवांवर परिणाम

महाबळेश्वर (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम आणि अतिपावसाळी भागांमध्ये उभारले गेलेले मोबाईल टॉवर विजेच्या अभावामुळे फक्त शोपीस ठरत आहेत. या टॉवरना वीज कनेक्शन नसल्यामुळे ते सौर ऊर्जेवर चालवले जातात, मात्र सलग ढगाळ हवामानामुळे पावसाळ्यात हे टॉवर सतत बंद पडतात. परिणामी, नागरिकांचे मोबाईल सेवा तुटक पडत असून अनेकदा ते पूर्णपणे संपर्कविहीन अवस्थेत जातात.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुलदिप शिवराम यादव यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, “या भागात तीन-तीन महिने सूर्य दिसत नाही. त्यामुळे सौर उर्जेवर चालणारे टॉवर अपयशी ठरतात. ही केवळ तांत्रिक समस्या नाही, तर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा प्रश्न आहे.”
डॉ. यादव यांनी वीज वितरण कंपनी आणि बीएसएनएल यांच्यात तातडीने समन्वय साधून, विजेचे स्थिर कनेक्शन देण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की या भागात प्रायव्हेट कंपन्यांचा प्रवेश शक्य नसल्यामुळे बीएसएनएल हाच एकमेव आधार आहे.
स्थानिक नागरिकांनी देखील यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे आरोग्य सेवा, बँकिंग व्यवहार, आपत्कालीन मदत आणि ऑनलाइन शिक्षण यांसारख्या अत्यावश्यक सेवा ठप्प होतात.
सध्या प्रशासन, बीएसएनएल व वीज वितरण विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. या भागाला डिजिटल भारताशी जोडायचे असेल, तर बीएसएनएलने “कनेक्टिंग इंडिया” या आपल्या घोषवाक्यानुसार यापुढे ठोस पावले उचलण्याची गरज आहे.



