महाबळेश्वर-पाचगणीत पावसाची संततधार, पर्यटक उत्साहात


भिलार प्रतिनिधी महाबळेश्वर: गेले तीन दिवस महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात पावसाची रिमझिम सुरू असून, या आल्हाददायक वातावरणाचा पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत. सततच्या पावसामुळे येथील निसर्ग अधिकच हिरवागार आणि टवटवीत झाला आहे, ज्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.टेबल लँड, पारशी पॉईंट, सिडनी पॉईंट, वेण्णा लेक , लिंग माळा वॉटर फॉल,भिलार वॉटर फॉल आणि मॅप्रो गार्डन यांसारख्या प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. दाट धुक्याची झालर आणि गार वाऱ्याच्या झुळका यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत.या थंडगार वातावरणात गरमागरम मका कणीस, भाजलेले चणे आणि गरमागरम चहा यांचा आस्वाद घेताना पर्यटक दिसत आहेत. स्थानिक विक्रेत्यांसाठीही हा चांगला काळ असून, त्यांच्या व्यवसायात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच असे निसर्गरम्य वातावरण तयार झाल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

