शशिकांत शिंदे व रोहित पवार यांचा महाबळेश्वर येथे भव्य नागरी सत्कार


महाबळेश्वर (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते, माजी जलसंपदा मंत्री व नव नियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचा आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांचा महाबळेश्वर येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या गौरव समारंभात संपूर्ण तालुक्याचा उत्साह आणि एकात्मता दिसून आली.
हा कार्यक्रम महाबळेश्वरमधील प्रसिद्ध हॉटेल ड्रीमलँड येथे ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडला. शिंदे यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीतला हा एक महत्वाचा टप्पा समजला जात आहे. तसेच रोहित पवार यांची कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड ही युवा नेतृत्वाला मिळालेली मोठी संधी मानली जात आहे.कार्यक्रमास महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजेंद्र शेलार, तालुकाध्यक्ष सुभाष कारंडे, तालुका सरचिटणीस सुनील संकपाळ, तसेच ज्येष्ठ नेते विश्वनाथदादा संकपाळ यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, नेते राजेश कुंभारदारे, माजी नगरसेवक डी. एम. बावळेकर, सचिन वागदरे, संतोषअप्पा जाधव, राजाभाऊ गुजर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला. किसन भिलारे, अप्पासाहेब साळुंखे आणि राजेश्री भिसे यांनी आपली उपस्थिती दर्शवत शिंदे व पवार यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात दोन्ही नेत्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्याच्या विविध भागांतील ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोन्ही नेत्यांचे जोरदार स्वागत केले.या गौरव समारंभानिमित्त महाबळेश्वर तालुक्यातील जनतेने आपल्या निष्ठावान नेतृत्वाचा सन्मान केल्याचे दृश्य होते. हा कार्यक्रम केवळ राजकीय सत्कार न राहता, एकात्मता, लोकाभिमुखता आणि प्रामाणिक नेतृत्वाचा गौरव ठरला.



