पाचगणी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर
मातब्बरांना धक्का; अनेकांना इतर प्रभागात पुनर्वसनाची वेळ!

पाचगणी,(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क):
पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. नगरपरिषद क्षेत्रातील १० प्रभागांतील २० जागांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित झाले असून, यामध्ये अनेक नामवंत राजकीय मातब्बरांना धक्का बसला आहे. परिणामी, त्यांना नव्या प्रभागात राजकीय गणित मांडावे लागणार आहे.
सोडत प्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात
सोडत कार्यक्रम नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. या वेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे अध्यक्षस्थानी होते. मुख्याधिकारी पंडित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, कार्यालयीन अधीक्षक प्रणव पवार उपस्थित होते.
शालेय मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या, त्यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते.
महिलांना मोठे प्रतिनिधित्व
या सोडतीनुसार २० पैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित जागा सर्वसाधारण, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि नागरिकांचा मागासवर्गीय (OBC) प्रवर्गांसाठी राखीव आहेत.
प्रभागनिहाय आरक्षणाचा तपशील
प्रभाग क्र. ‘अ’ जागा ‘ब’ जागा
१ ना.मा.प्र. सर्वसाधारण (महिला)
२ अनुसूचित जाती (महिला) सर्वसाधारण
३ अनुसूचित जाती सर्वसाधारण (महिला)
४ ना.मा.प्र. (महिला) सर्वसाधारण
५ ना.मा.प्र. (महिला) सर्वसाधारण
६ सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
७ ना.मा.प्र. (महिला) सर्वसाधारण
८ अनुसूचित जाती सर्वसाधारण (महिला)
९ अनुसूचित जाती (महिला) सर्वसाधारण
१० ना.मा.प्र. सर्वसाधारण (महिला)
या सोडत प्रक्रियेस माजी उपनगराध्यक्ष संतोष कांबळे, संतोष गोळे, प्रताप कऱ्हाडकर, चिंटू कऱ्हाडकर, प्रसाद कारंजकर, दीपक कांबळे, अनमोल कांबळे, अर्जुन जेधे, नामदेव चोपडे, नितीन सोनवणे, आनंद कांबळे, सुनील बगाडे, जॉन जोसेफ, प्रकाश मोरे, अविनाश भोसले, शानवाझ चौधरी, राजेंद्र भंडारी, किरण पवार आणि सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
हे दिग्गज सुरक्षित प्रभागात
माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, शेखर कासुर्डे, परवीन मेमन, उज्वला महाडिक, नारायण बिरामणे, हेमा गोळे, अनिता चोपडे, विनोद बिरामणे, अपर्णा कासुर्डे, नीता कासुर्डे, सुनंदा गोळे, रेखा कांबळे, आशा बगाडे, दत्ता दुधाने, शरद कासुर्डे या प्रस्थापित नेत्यांचे प्रभाग यावेळी सुरक्षित ठरले आहेत.
तसेच प्रकाश गोळे, महेश खांडके, नामदेव चोपडे, राजेंद्र पार्टे, वैभव कऱ्हाडकर, गायत्री कासुर्डे, प्रताप कऱ्हाडकर या नवोदितांसाठीही मार्ग सुकर झाला आहे.
या दिग्गजांना पुनर्वसनाची वेळ
तर प्रवीण बोधे, सुलभा लोखंडे, प्रसाद कारंजकर, शानवाझ चौधरी, किरण पवार, स्वप्नील परदेशी, महेश चौरसिया, दिलावर बागवान, पृथ्वीराज कासुर्डे, हरीश गोळे, रेखा जानकर, रेखा कांबळे, अनिल वन्ने आणि अनेक नवोदितांना या वेळी विविध प्रभागांमध्ये नव्याने वाटचाल करावी लागणार आहे.
—स्थानिक प्रश्नांवर होणार कसोटी
पाचगणीसारख्या पर्यटननगरीतील ही निवडणूक फक्त राजकीय नव्हे तर विकास, स्वच्छता, पर्यावरण, वसाहतीतील अडचणी आणि पर्यटन व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
