भिलारमध्ये ११० कुणबी दाखल्यांचे वाटप; नागरिकांत समाधानाचे वातावरण


भिलार, महाबळेश्वर: भिलार (ता. महाबळेश्वर) येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भिलारसह परिसरातील नागरिकांना कुणबी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या वितरणामुळे स्थानिकांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण असून, यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा तसेच नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
कुणबी दाखल्यांच्या वितरणात भिलार अग्रस्थानी
या विशेष कार्यक्रमात भिलारमधील १५ नागरिकांना, उंबरीतील १८ नागरिकांना, तर भोसे येथील ५ नागरिकांना कुणबी दाखले वितरीत करण्यात आले.
तालुक्यात सर्वाधिक दाखले भिलार गावातच वाटप झाले असून, मागील सहा महिन्यांपासून आजपर्यंत येथे एकूण ११० कुणबी दाखल्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे कुणबी दाखल्यांच्या वाटपात भिलार गाव अग्रस्थानी राहिले आहे.
शासकीय अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती
भोसे येथील नागरिक रामचंद्र धोंडीबा गोळे यांना दाखला मिळाल्यानंतर त्यांनी शासन व प्रशासनाचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाला ग्राम महसूल अधिकारी संजय पवार, ग्राम महसूल अधिकारी आर. व्ही. चव्हाण, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, पोलीस पाटील रूपाली कांबळे, तसेच जावळी महाबळेश्वर समितीचे संचालक राजेंद्र भिलारे आणि भाजपा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अनिल (नाना) भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महसूल अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य
या कुणबी दाखला वितरण प्रक्रियेत ग्राम महसूल अधिकारी एस. के. पवार (भिलार) यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रयत्नांबद्दल ग्रामस्थांच्या वतीने यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले
