पत्रकार नवनाथ पवार यांच्यावरील हल्ल्याचा कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांकडून निषेध


कोरेगाव (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क ):
कोरेगाव तालुक्यातील पत्रकार नवनाथ पवार यांच्यावर ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेचा कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास, नवनाथ पवार यांना “तु मटक्याची बातमी का लावली?” असे विचारून प्रशांत पवार याने मारहाण केली. त्यानंतर रात्री त्यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, दाखल गुन्हा फारच सौम्य स्वरूपाचा आहे. त्याशिवाय प्रशांत पवारचा मित्र निवास मेरुकर यानेही पवार यांना मोबाईलवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे त्याच्याविरोधातही नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवेदनाद्वारे कारवाईची मागणी:
डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य समन्वयक गणेश बोतालजी, माजी जिल्हाध्यक्ष संजय कदम आणि कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हणमंतराव बर्गे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांनी जुन्या तहसील कार्यालयात एकत्र येत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पत्रकारांनी प्रशांत पवारला तात्काळ अटक करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी केली.
पोलीस प्रशासनाची भूमिका:
पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी याप्रकरणी सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन योग्य त्या कलमांची वाढ करणार असल्याची ग्वाही दिली. या प्रकरणी लवकरच जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांची भेट घेणार असल्याचे पत्रकार संघटनांनी स्पष्ट केले.
निवेदन सादर करताना उपस्थित:
पांडुरंग बर्गे, सोमनाथ शिंदे, प्रकाश राजेकुंभार, संदीप पवार, साहिल शहा, राजेंद्र तरडेकर, अजमुद्दिन मुल्ला, दादा वाकडे, देवानंद जमादार, अधिक बर्गे, संभाजी भोसले, सुनील पाटे यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

