पाचगणीतून दिवसाढवळ्या अपहरण: राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपाचा आरोप

भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ, थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीतून एका व्यक्तीचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला पोलीस भासवणाऱ्या काही अज्ञात व्यक्तींनी पिस्तुलाचा धाक दाखवून संतोष शेडगे नावाच्या व्यक्तीचे अपहरण केले आणि त्याला मारहाण करत तडजोडनामा लिहून घेतला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष शेडगे यांची गाडी पाचगणीजवळ अडवण्यात आली. अनोळखी इसमांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले. त्यांनी शेडगे यांना शिवीगाळ करत, पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीत बसवले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने मुंबईला नेण्यात आले. तिथे त्यांना रात्रभर डांबून ठेवले आणि “वाद मिटवा, नाहीतर जेलमध्ये टाकू” अशी धमकी देत बळजबरीने तडजोडनामा लिहून घेण्यात आला.
या प्रकरणी भरत घरतसह चार जणांविरोधात अपहरण, मारहाण आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेमागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही संतोष शेडगे यांनी केला आहे. यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.
आरपीआय (ए) गटाचे संग्राम दादा रोकडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पर्यटनस्थळीच दिवसाढवळ्या असे प्रकार घडत असतील, तर कायद्याचा धाक कुठे राहिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या घटनेमुळे पाचगणीच्या शांततेला तडा गेला असून, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
