महाबळेश्वर – तापोळा रस्त्याच्या कामाची चौकशी करावी : राजेंद्र शेठ राजपुरे ; चौकशी न झाल्यास आंदोलनाचाही दिला इशारा

पांचगणी( टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क )
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून आज नव्याने काम करण्यात आलेला महाबळेश्वर तापोळा रस्ता वाहून गेला. त्यामुळे कोयनेतील गावांचा संपर्क तूटला आहे. या झालेल्या कामाची व ठेकेदाराची त्रस्त यंत्रणा नेमून चौकशी व्हावी आणि या ठेकेदाराला काळया यादीत टाकावे अन्यथा आम्ही यंत्रणेविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी कोयना व सोळशी विभागात भरघोस निधी दिला आहे. परंतु हे काम होत असताना एकाच ठेकेदाराने भरमसाठ कामे घ्यायची आणि ती मुदतीत पूर्ण करायची नाहीत.त्यामुळे या कामांचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. खचितच ही कामे निकृष्ट झाल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. आज वाहून गेलेला रस्ता हा खरेच पावसाने वाहून गेला आहे का कामच निकृष्ट झाल्याने वाहून गेला याची त्रस्त यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी. आणि यात जर ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळया यादीत टाकावे अशीही मागणी पत्रकारांना माहिती देताना श्री राजपुरे यांनी दिली आहे. सदरची कामे ही तीन वर्षापूर्वी सुरू झाली आहेत. अनेक कामे हव्यासापोटी घेतल्याने एक न धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती या ठेकेदाराची झाली आहे. ऐकाही कामावर या ठेकेदाराचे पूर्ण लक्ष नव्हते. त्यामुळे शासकीय निधीचा विनाकारण अपव्यय झाला आहे. कोट्यवधीची निधी येऊनही ठेकदाराच्या मनमौजी कामामुळे नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठेकदाराची व कामाची चौकशी व्हावी आणि चौकशी न झाल्यास आपण यंत्रणेविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशाराही शेवटी श्री राजपुरे यांनी दिला आहे.
कुरेशी ते येरणे या रस्त्यावर मंजूर झालेली पुलाची कामे आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी ठेकेदाराने सुरू केली आहेत. ती अर्धवट आहेतच पण आता एका बाह्य वळणावरील रस्ताही वाहून गेला आहे. काही गावांचा यामुळे संपर्क तुटला आहे. जर आता या रस्त्यावरून जाताना एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार हा ठेकरदार राहणार आहे. त्यामुळे या कामाची निविदा रद्द करण्यात यावी. त्यांच्या बेजबाबदार कामामुळे या परिसरातील नागरिकांना मुसळधार पावसात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. असेही शेवटी राजपुरे यांनी सांगितले आहे.
