महाबळेश्वर तालुक्यात ‘सेवा पंधरवडा’ साजरा होणार


महाबळेश्वर: (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)महसूल व वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, म्हणजेच १७ सप्टेंबर २०२५ ते महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पंधरवड्यात, ग्रामीण भागातील पाणंद रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग यांसारख्या रस्त्यांचे सीमांकन करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या अभियानाची अंमलबजावणी तीन टप्प्यांमध्ये केली जाईल:
पहिला टप्पा – पाणंद रस्त्यांसंदर्भात मोहीम.
दुसरा टप्पा – ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाला पूरक कार्यक्रम.
तिसरा टप्पा – जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार अभिनव उपक्रम राबवणे.
या अभियानासंदर्भात २ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार कार्यालयात एक बैठक पार पडली, ज्यात उप अधीक्षक भूमी अभिलेख, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.
अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया
या मोहिमेअंतर्गत, प्रत्येक गावातील ग्रामसेवक आणि ग्राम महसूल अधिकारी हे महसूल सेवक व पोलीस पाटील यांच्या मदतीने रस्त्यांची यादी तयार करतील. अतिक्रमित रस्त्यांच्या बाबतीत, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी रस्तानिहाय प्रस्ताव तयार करतील, जे ग्रामसभेपुढे ठेवले जातील. ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर, अंतिम यादी तहसीदारांकडे सादर केली जाईल. गाव नकाशावर नसलेल्या किंवा अतिक्रमित रस्त्यांचे सीमांकन उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून केले जाईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तहसीलदार हे मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ च्या कलम ५ अंतर्गत अतिक्रमणधारकांना नोटीस बजावतील आणि मंडळ अधिकारी कार्यालयात सुनावणी घेतली जाईल. आवश्यकता भासल्यास, तहसीलदार कलम ५ (२) नुसार अतिक्रमण हटवण्याचे आदेश देतील. त्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख हे नकाशात रस्त्याची नोंदणी ‘सार्वजनिक रस्ता’ अशी करतील. अतिक्रमण काढताना पोलिसांची मदत घेतली जाईल आणि यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. नकाशातील नोंदी रस्त्यांच्या नोंदी आतापर्यंत गाव नमुना नंबर १ (फ) मध्ये घेण्यात आलेल्या आहेत, कारण जुन्या नोंदी अधिकार अभिलेखात इतर हक्कात उपलब्ध नव्हत्या. या अभियानांतर्गत रस्त्यांना विशिष्ट सांकेतांक (कोड) क्रमांक दिले जातील, जे तहसीलदार यांच्या मान्यतेने गाव नमुना १ (फ) मध्ये नोंदवले जातील. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी (वाई) असून, गट विकास अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख, पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक सदस्य आहेत आणि तहसीलदार हे सदस्य सचिव आहेत.
तहसीलदार सचिन मस्के यांनी या अभियानाला व्यापक प्रसिद्धी देण्याचे आवाहन केले असून, शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




