
भिलार, प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार येथे सहा दिवसांच्या मुक्कामानंतर गौरी आणि गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी होणारे हे विसर्जन सोहळा गावामध्ये एक वेगळाच उत्साह घेऊन आला होता.
गेले सहा दिवस घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाची आणि गौरीची मनोभावे पूजा करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम, भजन आणि आरत्यांनी संपूर्ण गाव भक्तीमय झाले होते. बाप्पांच्या आगमनामुळे आलेले उत्साहाचे वातावरण विसर्जन मिरवणुकीपर्यंत टिकून होते.

आज सकाळी, आपापल्या घरांमध्ये गणपती बाप्पाची आरती आणि पूजा केल्यानंतर, ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण या मिरवणुकीत सहभागी झाले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत फुगड्या खेळत आणि गाणी गात मिरवणुकीची शोभा वाढवली.
गावातील गणपती पाझर तलावावर गणपती विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरणाची काळजी घेत गावातील श्रीराम मंडळ, ग्रामस्थ मंडळांनी शाडूच्या मूर्तींचे विसर्जन केले.
गणपती बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. बाप्पा मोरयाचा जयघोष आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. भिलार गावातील एकोपा आणि उत्साह या विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला.

