पांचगणी

स्वातंत्र्य सैनिकांच्या नातीची आजोबांच्या कष्टाच्या जागेसाठी क्रांतिकारक इशारा ; न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्टला पांचगणी नगरपालिकेसमोर आंदोलनाचा दिला इशारा

पांचगणी (टीम कृष्णकुंज नेटवर्क) : देश स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले मोलाचे योगदान दिले अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महाबळेश्वर तालुक्यातील अशाच एका स्वातंत्र्य सैनिकांनी आपली निष्ठा स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही देशासाठी वाहिली. जिल्हा बँकेचे संचालकपद त्यांनी तब्बल १० वर्ष भूषवले अशा आंब्रळ तालुका महाबळेश्वर येथील स्वातंत्र्यसैनिक बाबुराव रामचंद्र ओंबळे (सरकार) यांच्या कुटुंबियांना त्यांची हक्काची जमीन सुद्धा स्वातंत्र्यानंतर मिळू शकत नाही ही दुर्दैवाची बाब असून ओंबळे सरकार यांची नात सध्या या जागेसाठी शासकीय उंबरे झिजवत आहे. न्याय न मिळाल्यास आपण १५ ऑगस्ट रोजी पांचगणी नगरपालिकेसमोर आंदोलन करणार असल्याचे निवेदन सौ. क्रांती संतोष मांढरे यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.क्रांती संतोष मांढरे (राहणार वाशी नवी मुंबई ) स्वातंत्र्य सैनिक बाबुराव रामचंद्र ओंबळे (सरकार) यांची नात यांनी या निवेदनात पुढे म्हंटले आहे की. माझ्या आजोबांनी सन १९४६ साली मालमत्ता क्रमांक W-4000334, फायनल प्लॉट 14, गावठाण हिंद निवास हे घर बांधले आहे. सध्या वारस हक्काने ही मालमत्ता माझ्या नावे आहे. दरम्यान आजोबांनी हे घर अझीझ दाउद कुरवले आणि जैनुद्दीन पावसकर यांना भाड्‌याने दिले होते.  यातील जैनुद्दीन पावसकर हे मयत झाल्यानंतर त्यांचा मुलगा इरफान पावसकर याने माझे घर परस्पर मला न विचारता स्नेहा निखील भिलारे या महिलेस भाड्याने दिले तथा या महिलेने माझ्या घराशेजारील पडीक जागेवर बेकायदेशीर पत्र्याचे शेड उभारले आहे. हे घर धोकादायक झाले असल्याने नगर परिषदेने हे घर पाडण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार मी संबंधित भाडेकरूना हे घर खाली करण्यास सांगितले असता त्यांनी हे घर खाली करण्यास नकार देत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही अशी अरेरावीची भूमिका घेतली आहे. अनाधीकृत शेड पडण्यासाठी नगरपालिका आणि स्थानिक पोलीस स्टेशनला अनेकदा अर्ज करूनही कारवाई केली जात नाही. भाडेकरूंच्या या प्रवृत्तीमुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पाच वर्ष तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. केवळ भाड्‌याने दिलेले घर भाडेकरूने बळकावून त्यांनी आमच्या कुटुंबियांची फसवणुक केली आहे.जर नगरपालिका व स्थानिक पोलीस स्टेशन यांनी हा अन्याय दूर व्हावा यासाठी कोणतीही कारवाई केली नाही तर मी आपल्या पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद पांचगणी कार्यालयासमोर जन आंदोलन व आमरण पोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुख्याधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आशयाचे निवेदन सौ. क्रांती संतोष मांढरे यांनी जिल्हाधिकारी सातारा, प्रांताधिकारी वाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचगणी पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी वाई उपविभाग यांनाही दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button