दुधगाव उपकेंद्र स्थलांतरास मंजुरी मिळवण्यासाठी मंत्रालयस्तरावर लवकरच चर्चा – राजेंद्र शेठ राजपुरे

दुधागाव वार्ताहर (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
दुधगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे स्थलांतर तातडीने करण्याचा प्रश्न लवकरच मंत्रालय पातळीवर सोडविण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका महाबळेश्वर तालुक्यातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राजेंद्र शेठ राजपुरे यांनी व्यक्त केली आहे.
दुधगाव ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या विशेष बैठकीत विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी संजय गायकवाड, प्रवीण भिलारे, संतोष जाधव, राजेंद्र चोरमळे यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीत ढेबेवस्ती व बौद्धवस्ती येथील अपूर्ण पुलांचे काम, संरक्षण भिंतीचे अपूर्ण काम, पिण्याच्या पाण्याची टाकी व विहिरींची दुरवस्था, तसेच काही कंत्राटदारांनी अर्धवट सोडलेली विकासकामे या विषयांवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.राजेंद्र शेठ राजपुरे यांनी या सर्व समस्यांचा अभ्यास करून संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्याचे आणि आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. अपूर्ण कामांबाबत संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
दुधगाव ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीनुसार प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे स्थलांतर हे अत्यंत आवश्यक असून, यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सुलभ होणार आहे. हे लक्षात घेऊनच लवकरच मंत्रालयस्तरावर चर्चा करून मंजुरी मिळवली जाईल, असे राजपुरे यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत राजपुरे यांनी दुधगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपला सक्रिय सहभाग आणि पाठिंबा कायम राहील, असे आश्वस्त केले.



