पांचगणी

कोट्यवधींच्या खर्चाच्या चर्चांना बगल देत दीपक कांबळे यांचा ‘घरोघरी’ प्रचार; पाचगणीत जोरदार चर्चा!

पाचगणी:(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) पाचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जातीकरिता आरक्षित झाल्यामुळे या पदाची अनेकांना मोठी ओढ लागली आहे. लाखो-करोडोंच्या खर्चाच्या चर्चा बाजारपेठांमध्ये सुरू असून, अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी केली आहे. याच धामधुमीत, सर्वसामान्य चेहरा असलेले दीपक कांबळे मात्र घरोघरी जाऊन नगराध्यक्ष पदासाठी आपली योग्यता लोकांसमोर मांडत आहेत. त्यांच्या या वेगळ्या प्रचारपद्धतीमुळे शहरात त्यांची चर्चा वाढली आहे.
पाचगणी नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी झाले आहे. अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, दिवाळीनंतर कधीही तो लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी स्वतःला नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून प्रमोट करायला सुरुवात केली आहे, ज्यासाठी कोट्यवधींच्या खर्चाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
या करोडोंच्या बाजारात, दीपक कांबळे हे आपणच नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार आहोत हे जनतेच्या माध्यमातून सिद्ध करण्याकरिता भेटीगाठींवर भर देत आहेत. त्यामुळे नकळतपणे लोकांच्या चर्चेत कांबळे यांचे नाव पुढे येत आहे. यामुळे निवडणूकपूर्व चर्चांना मोठा ऊत आला आहे. अनेक इच्छूक उमेदवार “बोलविणे आल्याशिवाय नाही” या भूमिकेत राहून आघाडी-पॅनलच्या गणितात गुंतले आहेत आणि ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत आहेत.
दरम्यान, टेबललॅन्ड नाक्यावर लागलेले एक भव्य कटआउट बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये ‘अनुसूचित जातीचा नगराध्यक्ष कसा असावा?’ हे दर्शविल्याने जातीय ध्रुवीकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा असावा, अशी नागरिकांची धारणा असल्याने या बोर्डची चर्चा सर्वत्र आहे. असे असले तरी, जातीपातीच्या बाहेर जाऊन दीपक कांबळे यांनी छुप्या प्रचारात आघाडी घेतल्याने शहरात सध्या त्यांचाच बोलबाला चालू आहे.
पाचगणीचे नगराध्यक्षपद निवडणुकीपूर्वीच अनेकांनी बंद डोळ्यांनी स्वप्नात स्वतःला खुर्चीत बसलेले पाहिले आहे. नगराध्यक्षपदाचे हे ‘बोलके चित्र’ उघड्या डोळ्यांनी अनेकांना खुणावत आहे. अशा परिस्थितीत, करोडोंच्या बाजारात सर्वसामान्य दीपक कांबळे हे पाचगणी शहरवासीयांचे खास आकर्षण ठरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button