पत्रमहर्षी, पुढारीकर, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांचा ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
राज्यातील डिजिटल पत्रकारांच्यावतीने राजा माने यांनी पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा!


कोल्हापूर, (🗞️ टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) : आक्रमक पत्रकारितेला विकासाची जोड देत मराठी पत्रकारितेत एक वैभवशाली इतिहास घडविणारे, ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाचे आधारस्तंभ पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव यांचा उद्या, दि. ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात ऐतिहासिक ‘सहस्त्रचंद्रदर्शन’ सोहळा होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील डिजिटल पत्रकारांच्यावतीने त्यांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी ‘पुढारी’च्या कोल्हापूर कार्यालयात जाऊन पद्मश्री डॉ. जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत तेजस राऊत आणि उद्योजक उन्मेश साठे हेही उपस्थित होते. या भेटीदरम्यान डॉ. बाळासाहेब जाधव यांच्यासमवेत गप्पांची मैफलही रंगली.विशेष म्हणजे, राजा माने यांचे ‘पुढारी’ परिवाराशी जुने आणि विशेष ऋणानुबंध आहेत. त्यांनी ‘पुढारी’च्या पुणे आणि अहिल्यानगर (अहमदनगर) आवृत्त्यांचे कार्यकारी संपादकपद यशस्वीरीत्या सांभाळले होते. तसेच, त्यांच्या ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतले..’ या पुस्तकातही डॉ. बाळासाहेब जाधव यांचा समावेश महाराष्ट्रातील एक महनीय व्यक्तिमत्व म्हणून करण्यात आला आहे.सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या तयारीमध्ये व्यस्त असलेल्या ‘पुढारी’ माध्यम समूहाचे अध्यक्ष डॉ. योगेशदादा जाधव यांचीही राजा माने यांनी यावेळी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या या गौरवशाली सोहळ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.



