महाबळेश्वर तालुक्यात आरक्षण जाहीर; सभापतीपद मेडगुताड गणाला, तळदेव व कुभरोशी गणांवर दिग्गजांची चुरस


भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे तालुक्याच्या राजकारणात चुरस निर्माण झाली असून, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी मेडगुताड गणाला नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) हे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे या गणातून निवडून येणारा प्रतिनिधीच महाबळेश्वर तालुक्याचा पुढील सभापती होणार हे निश्चित झाले आहे.
तळदेव व कुभरोशी गणांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
तालुक्यातील तळदेव आणि कुभरोशी गण सर्वसाधारण खुल्या गटासाठी (Open) आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या दोन गणांमध्ये राजकीय वर्चस्वासाठी मोठी झुंज रंगणार आहे.
आमदार मकरंद पाटील यांची या भागात मजबूत पकड असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून आव्हान उभं करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भिलार गणात महिला आरक्षणामुळे ‘हिरमोड’
भिलार गणात सर्वसाधारण महिला (Open–Women) आरक्षण पडल्याने अनेक वरिष्ठ नेत्यांचा हिरमोड झाला आहे.
भिलार गण हा दिवंगत बाळासाहेब भिलारे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यांच्या विचारांचा वारसा राजूशेठ राजपुरे पुढे नेत आहेत.
आता भिलारे कुटुंबातून तेजस्विनी भिलारे यांचा राजकारणात प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.माजी सभापती रूपाली राजपुरे यांचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात असतानाच, भिलार गावचे माजी सरपंच वंदना भिलारे यांच्याही उमेदवारीची चर्चा रंगली आहे. वैशाली भिलारे, मंगल भिलारे, पूनम गोळे या नवीन चेहरेही या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषद निवडणूक: तळदेव गटावर मातब्बर आमनेसामने जिल्हा परिषदेसाठी तळदेव गट खुला तर भिलार गट अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) साठी आरक्षित झाला आहे.
तळदेव गटावर राजूशेठ राजपुरे आणि संजय गायकवाड हे दोघेही मकरंद पाटील यांचे समर्थक असून, दोघांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक प्रवीण भिलारे देखील या गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
खुल्या आरक्षणामुळे मंत्री मकरंद पाटील यांची डोकेदुखी वाढणार असून, तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
या आरक्षणाने महाबळेश्वर तालुक्यातील राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत कोण कोण रिंगणात उतरणार आणि कोणाचे समीकरण जुळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
