राजपुरी येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन


पाचगणी प्रतिनिधी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) –
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांच्यात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने राजपुरी येथील कैलासवासी एम. आर. भिलारे हायस्कूलमध्ये नुकतेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्नेह फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. जतिन भिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर घेण्यात आले.या शिबिरात सुमारे २५० ते ३०० विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान गरजू विद्यार्थ्यांना मोफत औषधे आणि गोळ्यांचे वाटप करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली.शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांनी आपली सेवा दिली. डॉ. विशाल निकाळजे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आरोग्यसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन केले. आहारतज्ज्ञ सौ. अनुजा मसुरकर यांनी महिलांना संतुलित आहार, आरोग्यदायी जीवनशैली आणि आवश्यक सवयींबद्दल विशेष जनजागृती केली. याशिवाय, अश्विनी विभुते आणि मनीषा हमपे यांनी औषधोपचारासह विविध आरोग्यविषयक सल्ला दिला.या उपक्रमात कै. एम. आर. भिलारे हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपुरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंब्रळ तसेच अंगणवाडी केंद्रे येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी मान्यवरांची उपस्थितीही लाभली. प्रमुख पाहुण्यांमध्ये विनिता मॅडम, सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. आपटे, सरपंच सौ. शितल राजपुरे तसेच ग्रामीण भागातील मुलांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्ते कार्ल डिसूजा हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.या शिबिरामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी आणि पालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, आयोजकांचा उपक्रम हा समाजासाठी आदर्श ठरत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
