पांचगणी व परिसरात यंदाच्या गणेशोत्सवात डीजे व डॉल्बीवर बंदी ; उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांची स्पष्ट तंबी

पांचगणी( टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क )
गणेशोत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी डीजे, डॉल्बी, लेझर लाईट यांसारख्या ध्वनिप्रदूषण करणाऱ्या साधनांवर यावर्षी पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेऊन उत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करण्याचे आवाहन वाई उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी केले आहे.पांचगणी पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित बैठकीत भालचिम बोलत होते. या वेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, विविध मंडळांचे पदाधिकारी व गावोगावचे पोलीस पाटील उपस्थित होते.
🔹 सामाजिक उपक्रमांवर भर देण्याचे आवाहन
सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की, गणेश मंडळांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम राबवावेत, जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश जाईल.
🔹 पर्यावरणपूरक विसर्जनाची दिशा
मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सुचवले की, मंडळांनी छोट्या मूर्ती बसवण्यावर भर द्यावा. टेबल लँड परिसरात तळविवर विसर्जन टाळण्यासाठी, कृत्रिम जलकुंड व निर्माल्य कलश उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे मंडळांनी व घरगुती गणपती भाविकांनीही कृत्रिम विसर्जनास प्राधान्य द्यावे.
या बैठकीला परिसरातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, नगरपालिका कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी दिलीप पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
🎖️ बाळासाहेब भालचिम यांना राष्ट्रपती पुरस्कार
बैठक सुरू असतानाच उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याची बातमी समजली. याबद्दल त्यांनी भाषणात नमूद केले की, “पाचगणीच्या पवित्र मातीत आल्यानंतरच हे पदक मिळाल्याची बातमी समजल्याचा मला अत्यंत आनंद आहे.”
या खास क्षणी मुख्याधिकारी पंडित पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.
