पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा निखिल जाधव यांची नियुक्ती


पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
प्रशासकीय काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात कुशल प्रशासनाचा अनुभव असलेल्या निखिल जाधव यांची पुन्हा एकदा पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे नगरपालिका प्रशासनात सातत्य व स्थैर्य राहणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.निखिल जाधव यांची सांगली -मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी निवड झाली असून त्यांच्या कार्यकौशल्यामुळे पुढील आदेशापर्यंत पाचगणी नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. जाधव यांनी यापूर्वीही प्रशासकीय कार्यकाळात शिस्तबद्ध व पारदर्शक प्रशासन, स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा सुधारणा, आणि विविध नागरी सुविधा प्रभावीपणे राबवल्या होत्या. त्यामुळेच त्यांचा कार्यकौशल पाहता त्यांना पुन्हा मुख्याधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.प्रशासकीय काळात त्यांच्यामार्फत टेबल लँड पठारावर सुरू असलेले स्टाॅलचे काम व जांभा दगडात केलेले पार्किंगचे काम, फुलपाखरू उद्यान, पर्यटकांच्या सोयीसाठी पारशी पाॅंईट व टेबल लॅन्ड पठारावर टाॅयलेट आदी विकास कामांची पोचपावती असल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.जाधव यांच्या नेतृत्वात नगरपालिकेच्या आगामी विकास योजना अधिक गतीमान होतील, असा विश्वास नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे
