सातारा

महिलांसाठी विभागनिहाय दाखले मिळण्याची सुविधा करा -आ. शिवेंद्रसिंहराजे

प्रांताधिकारी, तहसीलदारांना केल्या सूचना

सातारा(टीम कृष्णकुंज न्युज नेटवर्क)- राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली असून त्यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि डोमासाईल मिळवण्यासाठी ठिकठिकाणी महिलांची गर्दी होत आहे. महिलांची गैरसोय टाळण्यासाठी सातारा शहरात विभागनिहाय सुविधा केंद्र सुरु करा आणि त्याठिकाणी त्या- त्या भागातील महिलांना आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करून द्या, अशा सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, साताराचे तहसीलदार नागेश गायकवाड यांना दिल्या आहेत. त्यानुसार सातारा शहरात महिलांच्या सोयीसाठी सर्कलनिहाय सुविधा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सातारा तालुका आणि जावली तालुक्यातही सर्कलनिहाय सुविधा केंद्र करण्याचा निर्णय झाला आहे. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महिलांसाठीची योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल आदी कागदपत्रे आवश्यक असून ही कागदपत्रे मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सेतू आणि महा इ सेवा केंद्रांमध्ये महिलांची तुडुंब गर्दी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून भर पावसात महिला कागदपत्रे मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महिलांची गैरसोय टाळण्यासाठी आणि महिलांना लवकरात लवकर कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी सातारा शहरासह सातारा तालुका आणि जावली तालुक्यात विभागनिहाय सुविधा केंद्र सुरु करण्याची सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी साताऱ्याचे प्रांताधिकारी भोसले, तहसीलदार गायकवाड आणि जावलीचे तहसीलदार कोळेकर यांना दिल्या आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही करत सातारा शहरात विभागनिहाय सुविधा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा शहरात करंजे तर्फ, करंजे पेठ, बसप्पा पेठ, रघुनाथ पुरा, दरे खुर्द आणि शाहूपुरीसाठी तलाठी कार्यालय, करंजे (जुने संग्रहालय), सदरबझार, खेड आणि पिरवाडीसाठी तलाठी निवास एसटी स्टॅन्ड समोर, गोडोली, शाहूनगर, कामाठीपुरा आणि विलासपूरसाठी ग्रामपंचायत कार्यालय विलासपूर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, चिमणपूरा, व्यंकटपुरा, रामाचा गोट, यादोगोपाळ पेठ, माची पेठ, प्रतापगंज, सदाशिव पेठ, भवानी पेठ यासाठी तलाठी कार्यालय राजवाडा तर, गुरुवार पेठ, शनिवार पेठ, मल्हार पेठ, पंताचा गोट, दुर्गा पेठ, केसरकर पेठ आणि राजसपुरा त्याभागातील महिलांसाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सुचवलेल्या ठिकाणी सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. याठिकाणी त्या- त्या भागातील महिलांना आवश्यक कागदपत्रे मिळणार आहेत. सातारा तालुक्यातील तलाठी कार्यालयांमध्ये तर, जावली तालुक्यातील कुडाळ, करहर, आनेवाडी, केळघर, बामणोली आणि मेढा येथे सुविधा केंद्र सुरु करण्यात येत आहे. दरम्यान, महिलांची कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्या आहेत. काही अडचण आल्यास सुरुची जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहनहीआ.शिवेंद्रसिंहराजेंनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button