मेढा

बोगस खेळाडूंना आळा घाला, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन – ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांचा इशारा

मेढा (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)राज्यातील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये, विशेषतः कुस्ती स्पर्धेत, वय चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे प्रामाणिक आणि नियमांनुसार खेळणाऱ्या खेळाडूंवर मोठा अन्याय होत आहे.या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात,अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष आणि क्रीडाप्रेमी ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांनी दिला आहे.
​एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “कला आणि क्रीडा या दोन्ही महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरा आहेत. ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायात व्यसनमुक्त, सुसंस्कृत आणि सदाचारी तरुण वर्ग दिसतो, त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील तरुण हे महाराष्ट्राची शान आहेत,” असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील महान पैलवान आणि विविध क्षेत्रातील खेळाडूंनी हे सिद्ध केले आहे. त्यामुळेच आमच्यासारखे लाखो क्रीडाप्रेमी कुस्ती आणि पैलवानांवर जीवापाड प्रेम करतात. खेळाडूंच्या भावनांचा आदर राखत शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी आणि बोगस खेळाडूंना आळा घालावा, असे आवाहन त्यांनी केले.
​पत्रकात पुढे असेही म्हटले आहे की, शालेय क्रीडा महासंघ (SGFI) आणि राज्य शासनाच्या जीआरनुसार खेळाडूंच्या कागदपत्रांमध्ये जन्मप्रमाणपत्र, आधारकार्ड आणि इयत्ता पहिली प्रवेशाची शाळेची नोंदवही या तीनही कागदपत्रांच्या सत्यप्रती अनिवार्य आहेत. परंतु, या नियमांची अंमलबजावणी करताना मोठा गोंधळ दिसून येत आहे. त्यामुळे आधार कार्डची गुगल हिस्ट्री काढून त्याची सत्यप्रत जोडणे बंधनकारक करावे, अशी विनंती त्यांनी केली.
​जर शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले तर आगामी शासकीय क्रीडा स्पर्धांवर नाराजी व्यक्त करत मोठे आंदोलन उभे करू, असा इशारा ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button