गणेशोत्सव २०२५ साठी पाचगणी पोलीस स्टेशन सज्ज


भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क ) २६ ऑगस्ट २०२५ — यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी पाचगणी पोलीस ठाणे पूर्णपणे सज्ज झाले आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार, यांनी १४ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व गणेशोत्सव मंडळांची बैठक घेतली. या बैठकीला पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पाटील आणि वाई विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बाळासाहेब भालचिम देखील उपस्थित होते.या बैठकीत सर्व मंडळांना ‘डीजे’चा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हा संपूर्ण गणेशोत्सव ‘डीजे’ मुक्त असावा असे आवाहन करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात आणि विसर्जनाच्या वेळी पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा, लेझीम, बँड आणि आकर्षक सजावटींना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा एकतेचा सण असून, पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून समाजात चांगला संदेश जावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगण्यात आले आहे.दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी, पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार यांनी रूट मार्च काढला. या रूट मार्चमध्ये १ अधिकारी, १५ पोलीस अंमलदार, ८ एमएसएफ आणि १२ होमगार्ड यांचा सहभाग होता. हा मार्च जुने पोलीस स्टेशन-छत्रपती शिवाजी महाराज चौक-मस्जिद रोड-धोबी गल्ली-एसटी स्टँड-छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मार्गावरून काढण्यात आला.सार्वजनिक गणेश मंडळांच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी २०२४ सालापासून ‘गणराया अवॉर्ड’ देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सन २०२४ मध्ये, खालील मंडळांना ‘गणराया अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले होते:
प्रथम क्रमांक: श्रीराम गणेशमंडळ, भिलार
द्वितीय क्रमांक: कार्तिक स्वामी कला क्रीडा मंडळ, राजपुरी
तृतीय क्रमांक: युथ फोरम मंडळ, पाचगणी
उत्तेजनार्थ: सिद्धेश्वर मंडळ, अर्हमनगर
सन २०२५ मध्ये देखील उत्कृष्ट गणेश मंडळांना ‘गणराया अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५२ व्यक्तींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (भा.ना.सु.सं.) कलम १६८० नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच, भा.ना.सु.सं. कलम १२६ नुसार ३ व्यक्तींवर आणि भा.ना.सु.सं. कलम १६३ नुसार ३ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. एका व्यक्तीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम ९३ नुसार मा. प्रांत अधिकारी, वाई विभाग यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
ही प्रेस नोट सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या मान्यतेने जारी केली आहे

