भिलार

भिलारमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; वनविभागाची तात्काळ दखल

भिलार (टीम कृष्णकुज न्युज नेटवर्क) महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावात बिबट्याचा वाढता वावर आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ गावात भेट देऊन पाहणी केली.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्या रात्रीच्या वेळी गावातील वस्तीत येत असून, त्याने पाळीव कुत्र्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडले आहेत. विठ्ठल पांडुरंग कांबळे यांच्या घराजवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याने पाळलेल्या कुत्र्यावर हल्ला केल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. यामुळे लहान मुले आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेबाबत गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


या घटनेची माहिती मिळताच गुरेघर वन परिक्षेत्र अधिकारी आर. व्ही. काकडे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या पथकाने तात्काळ भिलार गावाला भेट दिली. यावेळी वनरक्षक बी. एस. जावीर, वनशिपाई संजय भिलारे आणि साहेबराव पारठे हे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची पाहणी केली. वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आणि लहान मुलांना घराबाहेर पाठवू नये असे आवाहन केले आहे. यावर तातडीने पुढील पाऊल उचलण्याचे आश्वासनही वनविभागाने दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button