मेढा

आळजापूरचा दारूबंदीचा लढा महाराष्ट्राला दिशा देणार- विलासबाबा जवळ

मेढा (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)आळजापूर ता.फलटण येथे सहा महिन्यापूर्वी सुरू झालेल्या परमिट रूम बार या दारू दुकानाला विरोध करीत महिला व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी गावात सुरू केलेला लढा आता अंतिम टप्प्यात आला असून दि.११ जानेवारी २०२५ रोजी आडव्या बाटलीला गावातील महिला १००% मतदान करून दारू दुकान हद्दपार करून महाराष्ट्राला नवी दिशा देणार असल्याचे मत व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक व दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते श्री विलासबाबा जवळ यांनी व्यक्त केले आहे.
आळजापूर येथे परमिट रूम बारला परवानगी देत असताना ग्रामपंचायतीचा कोणतीही परवानगी अथवा ना हरकत दाखला न घेता उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली होती.गावात याची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सरपंच श्री शुभम नलवडे यांनी या विषयावर तातडीने बैठक बोलावली होती.गावातील सर्वच महिला व ग्रामस्थ यांनी आपल्या गावात दारूचे दुकान नको म्हणून भूमिका घेतली.विलासराव नलवडे, नितीन नलवडे व इतर सहकार्‍यांनी माहितीघेत मा.जिल्हाधिकारी सातारा यांना गावातील महिलांचे सह्यांचे निवेदन दिले.यावर उत्पादन शुल्क विभागाने महिलांच्या सह्यांची पडताळणी करून २५% पेक्षा अधिक महिला मतदारांची मागणी असल्याने मा.जिल्हाधिकारी यांनी ११ जानेवारी २०२५ रोजी या गावात मतदानाची तारीख दिली आहे. महिलांचा दारूबंदीचा लढा यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वच युवक मंडळांनी प्रयत्न सुरू केले असून गावातील वाडी- वस्तीवर पोहचून आडव्या बाटलीचा प्रचार केला जात आहे.सर्व ग्रामस्थ,महिला, युवक,विद्यार्थी यांनी दिलेल्या योगदानामुळे व शालेय विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे काढलेल्या जनजागृती रॅलीमुळे आळजापूरचा दारूबंदीचा लढा यशस्वी होणार असून दारूबंदीच्या चळवळीला बळकटी देणारा ठरणार आहे.

मागील सरकार मधील उत्पादन शुल्क मंत्र्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकारांना तिलांजली देत राज्यभरात परमिटरूम बारची वाटलेली खैरात अशाच पध्दतीने बंद करण्यासाठी गावागातून लोकांनी उठाव करावा यासाठी विलासबाबा जवळ यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघ प्रयत्नशिल रहाणार आहे.
जगन्नाथ शिंदे
मा.अध्यक्ष व्यसनमुक्त युवक संघ सातारा जिल्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button