दानवली गावात बिबट्याने केली बकरी फस्त; गावात भीतीचे वातावरण


भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क )दानवली, (ता. महाबळेश्वर) – दानवली गावातील खालची माची शिवारात आज दुपारी दोनच्या सुमारास खालची माची नावाच्या शिवारात बिबट्याने एका बकरीला ठार मारले. विश्वनाथ तुकाराम दानवले यांची ही बकरी रानात चरत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला आपले भक्ष्य बनवले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. गावात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत. या घटनेमुळे पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
