दांडेघरची ‘हॅरिसन फॉली’ अखेर सील; प्रशासनाकडून थापा पॉईंटचा ताबा; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही पक्षांना मज्जाव पॉईंटचा ताबा; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही पक्षांना मज्जाव


पांचगणी :(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दांडेघर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘हॅरिसन फॉली’ (थापा पॉईंट) या वादग्रस्त जमिनीवरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर प्रशासनाने पडदा टाकला आहे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सचिन मस्के यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६४ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत, स.नं. १० मधील ६.९१ हेक्टर क्षेत्र सील करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे दांडेघर ग्रामस्थ आणि वहिवाटदार सुहास वाकडे यांच्यातील प्रदीर्घ संघर्षाला प्रशासकीय वळण मिळाले असून, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय, टोल वसुली किंवा बांधकामाला तूर्तास बंदी घालण्यात आली आहे.
दांडेघर येथील स.नं. १० ही जमीन श्री केदारेश्वर देवस्थान ईनाम वर्ग ३ ची मिळकत आहे. या जमिनीच्या ताब्यावरून दांडेघर ग्रामस्थ मंडळ (पार्टी नं. १) आणि सुहास वाकडे व इतर (पार्टी नं. २) यांच्यात जुना वाद आहे. पाचगणी पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार, या जमिनीच्या ताब्यावरून दोन्ही गटांत वारंवार भांडणतंटा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.
ग्रामस्थांच्या मते, ही जमीन १९३० पासून त्यांच्या कब्जेवहिवाटीत आहे. पूर्वी येथे ग्रामस्थांमार्फत शूटिंग व पर्यटनातून मिळणारे उत्पन्न देवस्थानच्या खर्चासाठी वापरले जात असे. मात्र, काही व्यक्तींनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून स्वतःची नावे लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुसरीकडे, सुहास वाकडे यांनी महसूल आणि दिवाणी न्यायालयाच्या आदेशांचा दाखला देत आपला ताबा कायदेशीर असल्याचे म्हटले होते.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि जमिनीची संवेदनशीलता लक्षात घेता, तहसीलदार सचिन मस्के यांनी स्पष्ट केले की, हे न्यायालय मालकी हक्काचा निकाल देत नसून केवळ सार्वजनिक शांतता राखण्यासाठी प्रत्यक्ष ताब्याच्या अनुषंगाने निर्णय घेत आहे. आदेशानुसार, पाचगणी पोलिसांनी वादग्रस्त जागा सील केली असून, दोन्ही पक्षांना त्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
कारवाईच्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, मंडळ अधिकारी रुपेश शिंदे, तलाठी सुदाम मामीलवार, पोलीस पाटील योगिता खरात आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते.
“शासनाच्या निर्णयावर आमचा पूर्ण विश्वास”
ग्रामस्थांची प्रतिक्रिया:
“हॅरिसन फॉली ही जागा आमच्या पूर्वजांनी जपून ठेवलेली आमची मालमत्ता आहे. १९३० पासून ग्रामस्थच याची निगा राखत होते. मध्यंतरीच्या काळात झालेल्या अन्यायाविरुद्ध आमचा कायदेशीर लढा सुरूच आहे. आज प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. उशिरा का होईना पण ‘अंधेर नाही’, या उक्तीप्रमाणे आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे. शासनाच्या निर्णयावर आमचा पूर्ण विश्वास असून, भविष्यात ही जागा पुन्हा ग्रामस्थांच्या ताब्यात येईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.”
— भरत कळंबे, दांडेघर ग्रामस्थ मंडळ


