

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पाचगणी पोलिसांनी अवैध व्यवसाय, संशयित हालचाली तसेच चोरीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत विविध प्रकरणांत गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
पाचगणी पोलिसांनी हद्दीतील पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अवैध दारू विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे ९८२ रुपये किमतीच्या गावठी दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. पोलिसांनी चोरीच्या प्रकरणातील संशयितांकडून माहिती घेत चोरीस गेलेले काही बॅटरी बँड व अन्य साहित्य हस्तगत केले असून ते फिर्यादींना परत करण्यात आले आहे.
याशिवाय, सुमारे ८ हजार रुपये रकमेच्या चोरीप्रकरणीही संशयितांकडून तपास सुरू असून संबंधितांकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

