बिबट्याच्या दहशतीमुळे भिलार परिसरात वनविभागाच्या रात्र गस्तीत वाढ


भिलार : (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) महाबळेश्वर तालुक्यातील भिलार परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने या भागात रात्रगस्तीत वाढ करून बिबट्याविषयी जनजागृती मोहीम राबवली.
बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिक घाबरले आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन वनविभागाने तातडीने पाऊले उचलली. वनविभागाच्या पथकाने बिबट्याचा वावर असलेल्या संभाव्य ठिकाणी जाऊन पाहणी केली, तसेच रात्रीच्या वेळी गस्त घातली. गस्तीदरम्यान त्यांना कोणत्याही ठिकाणी बिबट्या आढळून आला नाही, मात्र दक्षता म्हणून रात्रभर गस्त सुरूच ठेवली.यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केले. रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने जाऊ नये, जाताना टॉर्चचा व हातामध्ये काठी चा वापर करावा, तसेच लहान मुलांना सायंकाळी घराबाहेर पडू देऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
अमोल सातपुते उपवनसंरक्षक साहेब सातारा, मा. प्रदीप रौंदळ साहेब सहाय्यक वन संरक्षक सातारा व म.ह. मोहिते वनक्षेत्रपाल महाबळेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली या गस्तीमध्ये काकडे वन परिमंडळ अधिकारी गुरेघर., बी.सी.जावीर वनरक्षक गुरेघर,
संजय श्रीपती भिलारे कायवन मजूर गुरेघर यांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून ही गस्त यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
